जोपर्यंत सीमारेषेलगत असणाऱ्या हवाई तळांवरील लढाऊ विमानं मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही प्रवासी विमानांसाठी हवाई मार्ग खुला करणार नाही असं पाकिस्तानने भारताला सांगितलं आहे. पाकिस्तानचे विमानचालन सचिव शाहरुख नुसरत यांनी संसदीय समितीला ही माहिती दिली. भारतीय हवाई दलाने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांचा हवाई मार्ग बंद केला होता.

शाहरुख नुसरत हे नागरी उड्डयन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण भारतीय अधिकाऱ्यांना जोपर्यंत सीमारेषेलगत असणाऱ्या हवाई तळांवरील लढाऊ विमाने मागे घेतली जात नाहीत तोपर्यंत हवाई मार्ग उपलब्ध होणार नाही अशी कल्पना दिली आहे. डॉन न्यूजने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“भारतीय सरकारने आम्हाला हवाई मार्ग खुला करावा यासाठी संपर्क साधला. आम्ही आमची काळजी व्यक्त केली असून आधी लढाऊ विमानं मागे घेतली जावीत असं सांगितलं आहे”, अशी माहिती नुसरत यांनी समितीला दिली आहे. भारतीय हवाई तळांवर अद्यापही लढाऊ विमाने तैनात असल्याने सध्या हे शक्य नसल्याचंही सांगितलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानने हवाई मार्ग बंद केला असल्या कारणाने भारताला सध्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. भारताने पाकिस्तानसाठी आपला हवाई मार्ग सुरु केल्याचा दावा यावेळी फेटाळण्यात आला. थायलंडमधून उड्डाण करणाऱी पाकिस्तानी सेवा अद्यापही भारतीय हवाई मार्ग बंद असल्याने सुरु कऱण्यात आलेली नाही. मलेशियामधील पाकिस्तानी विमान सेवाही बंद असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पाकिस्तानने हवाई मार्ग बंद ठेवला असल्या कारणाने भारताला खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे.