भारताचे उच्चायुक्त बिसारिया यांना पाचारण

इस्लामाबाद : पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याबाबत, तसेच बंदी घातलेल्या या संघटनेचे आपल्या देशात अस्तित्व असल्याबाबत पाकिस्तानने बुधवारी भारताकडून पुराव्याच्या स्वरूपातील ‘अधिक माहिती’ मागितली.

पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जांजुआ यांनी भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परराष्ट्र मंत्रालयात पाचारण केले आणि ‘पुलवामा घटनेबद्दल’ पाकिस्तानचे ‘प्राथमिक निष्कर्ष’ त्यांना सांगितल्याची माहिती परराष्ट्र कार्यालयाने दिली. या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख त्यांनी ‘घटना’ म्हणून केली.

भारताने पुलवामा हल्ल्याबाबत दिलेल्या माहितीची (डॉसियर) तपासणी केल्यानंतर भारताला प्राथमिक निष्कर्षांबाबत सांगण्यात आले, असे मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले. पुलवामा हल्ल्यात जैशचा सहभाग असल्याचे नेमके तपशील देणारी माहिती भारताने पाकिस्तानच्या प्रभारी उच्चायुक्तांना २७ फेब्रुवारीला नवी दिल्लीत सोपवली होती. ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आम्ही भारताला अधिक माहिती / पुरावा मागितला आहे, असे परराष्ट्र कार्यालयाने सांगितले. भारताने ‘विश्वासार्ह पुरावा’ दिल्यास तपासात सहकार्य करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

दहशतवाद्यांच्या गोळीबारात नागरिक ठार

श्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्य़ात संशयित दहशतवाद्यांनी बुधवारी एका नागरिकाला गोळ्या घालून ठार मारले. दक्षिण काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्य़ातील बेमनिपोरा भागातील रहिवासी तन्वीर अहमद दार याच्यावर अतिरेक्यांनी दुपारी काचदूरा खेडय़ानजीक गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमा होऊन दार लगेच मरण पावला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.