पंजाबमधून लाहोरमध्ये पारेषण वाहिनी टाकून किमान ५०० मेगाव्ॉट वीज द्यावी, अशी मागणी पाकिस्तानने भारताकडे केली आहे. याबाबत भारताकडून सकारात्मक पावले उचलण्याचा विचार सुरू आहे.
पाकिस्तानातील ग्रीडला हाय-व्होल्टेज डायरेक्ट करंटने (एचव्ही डीसी) कसे आणि कोठे जोडता येईल, याचा विचार सध्या भारतात सुरू आहे. ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याबाबत एक तज्ज्ञ समिती पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली असताना भारताकडून ऊर्जा खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
पारेषण वाहिनी उभारण्याचे काम करण्यास विशेष कालावधी लागणार नाही आणि काही महिन्यांतच त्याद्वारे पाकिस्तानला विजेचा पुरवठा केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, खरेदी आणि तांत्रिक-वाणिज्यिक त्याचप्रमाणे सार्वभौम व्यवस्थेबाबतचा तपशील ठरविणे गरजेचे असून त्यावर विचार सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानात विजेची तीव्र टंचाई असून भारताकडून वीज मिळविण्यासाठी त्यांनी सर्व पर्याय खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला भारताकडून वीज खरेदी करावी लागेल. सदर वीज खासगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील वीजनिर्मिती प्रकल्पातून विकत घ्यावी लागेल.
पाकिस्तानला भारताकडून ५०० मेगाव्ॉट विजेची गरज असून त्यासाठी त्यांना पारेषणप्रणाली उभारावी लागेल, कारण त्याद्वारेच वीज देता येणे शक्य होणार आहे. त्याच वेळी भारताला आपले पारेषण जाळे उभारावे लागणार आहे.