काश्मीरप्रश्नी अमेरिकेने भारताशी मध्यस्थी करावी, अशी मागणी पाकिस्तानने रविवारी केली असून भारताने ती धुडकावली आहे. अमेरिकेनेही काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याचे सांगत मध्यस्थीस नकार दिला आहे. एकीकडे चर्चेसाठी तुणतुणे वाजवतानाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हल्ले चढविण्याचा पाकिस्तानचा डाव रविवारीही कायम राहिला.  
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ अमेरिका दौऱ्यावर असून बुधवारी ते अध्यक्ष बराक ओबामा यांना काश्मीर प्रश्नी साकडे घालणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अमेरिकेने रविवारीच मध्यस्थीला नकार जाहीर केल्याने त्यांची कोंडी झाली आहे.
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तान शस्त्रसंधीचा वारंवार भंग करीत आहे. त्यामुळे सीमेवरील स्थिती शांत होईपर्यंत चर्चा फलदायी होणार नाही, असे भारताकडून बजावले जाणार असल्याचे समजते. सरहद्दीवर शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न दोन्ही देशांच्या लष्करी प्रतिनिधींमधील चर्चेद्वारे होतील, असा निर्णयही भारताने घेतला आहे.
पुन्हा गोळीबार
काश्मीरच्या आर एस पुरा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून भारतीय छावण्यांवर रविवारी रात्री गोळीबार सुरू झाला आहे. जवानांकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील सरहद्दीलगतच्या भागांना भेट देणार आहेत.