पाकिस्तानी सिनेटने सोमवारी काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ या पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव केला. ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पाकिस्तानातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाने सोमवारी हा ठराव मंजूर केला.
हुर्रियत कॉन्फरन्सचे माजी प्रमुख आणि फुटीरतवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांना हा पुरस्कार प्रदान करावा, असे सिनेटने सरकारला सांगितले आहे. सय्यद अली शाह गिलानी यांचा आत्तापर्यंतचा आयुष्याचा जो प्रवास आहे, त्याचा शालेय अभ्याक्रमात समावेश करावा अशी मागणी सुद्धा या ठरावात करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
इस्लामाबादमधील एका इंजिनिअरींग विद्यापीठालाही गिलानी यांचे नाव द्यावे, असे या ठरावात सुचवण्यात आले आहे. सय्यद अली शाह गिलानी यांनी हुर्रियत कॉन्फरन्सचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना पाकिस्तानातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात ऑडिओ मेसेजमध्ये गिलानी यांनी राजीनाम्याची घोषणा केली. ९० वर्षीय गिलानी यांनी प्रदीर्घकाळ हुर्रियतचे नेतृत्व केले. २०१० पासून ते बहुतांशकाळ नजरकैदेतच होते. ‘भविष्याची दिशा ठरवण्यासाठी सदस्य आता पूर्णपणे मुक्त आहेत’ असे गिलानी यांनी म्हटले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 3:25 pm