संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने खडसावले

जिनेव्हा : पाकिस्तानमधून दहशतवादाला होणारे आर्थिक साहाय्य थांबवावे आणि पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रांतातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावे, असा सल्ला भारताने शुक्रवारी पाकिस्तानला दिला. जम्मू-काश्मीरमधील सकारात्मक विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू असून त्याचीही भारताने निंदा केली आहे.

आर्थिक कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) पाकिस्तानला ‘करडय़ा यादी’तच ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका आठवडय़ाने भारताने मत व्यक्त केले आहे. मानवी हक्क परिषदेच्या ४३ व्या सत्रात पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील मानवी हक्कांबद्दल चिंता व्यक्त केली. त्याला भारताने उत्तर देण्याच्या अधिकार वापरून खडसावले. पाकिस्तानच्या उन्मादपूर्ण प्रतिक्रियेमुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल होऊ शकत नाही, असे भारताचे सचिव विमर्श आर्यन यांनी खडसावले. त्यांनी पाकिस्तानला १० मुद्दे असलेली सल्ला यादी दिली आहे.