पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताच्या विशेष प्रशिक्षित कमांडोंनी सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती उघड करण्यात आल्यानंतर अमेरिकेने भारताला पाठिंबा देत पाकिस्तानला त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानने तातडीने दहशतवाद रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याअगोदर भारताने अमेरिकेला याबद्दल काही माहिती दिली होती का, याला पुष्टी मिळालेली नाही. अमेरिकेने या माहितीला दुजोरा दिलेला नाही. त्याचबरोबर ते स्पष्ट शब्दांत फेटाळलेलेही नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी माध्यमांशी या संदर्भात संवाद साधला.
ते म्हणाले, उत्तर काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणावात वाढ होणार हे अगदी अपेक्षित आहे. यामध्ये जास्त खोलात जाण्याची माझी इच्छा नाही. पण या स्वरुपाचा हल्ला अधिक भयानक असतो. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईची माहिती आम्ही घेतली आहे. आम्ही परिस्थितीचे जवळून निरीक्षण करतो आहोत. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी या कारवाईनंतर एकमेकांशी संवाद साधला आहे. दोन्ही देशांना आमचा संदेश एकच आहे. परस्परांशी संवाद वाढवा आणि आपसातील प्रश्न चर्चेने, शांततेच्या मार्गाने सोडवा. तणावाची स्थिती वाढवू नका, असे कर्बी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या संदेशातून अमेरिकेने पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकला उत्तर न देण्याचे स्पष्टपणे सांगितले असल्याची चर्चा सध्या अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या अभ्यासकांमध्ये आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानला कोणताही पाठिंबा मिळणार नाही, हे सुद्धा हळूहळू स्पष्टच होऊ लागले आहे.
सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताच्या परराष्ट्र सचिवांनी वेगवेगळ्या देशांच्या भारतातील राजदूतांना बोलावून त्यांना या कारवाईबद्दल माहिती दिली होती.