उत्तर प्रदेशच्या खतौली विधानसभेवरून निवडून आलेले भाजपा आमदार विक्रम सैनी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाकिस्ताननं आपल्या देशातही सुधारित नागरकत्व कायद्यासारखा एखादा कायदा तयार करावा आणि भारतातील पीडित मुस्लिमांना पाकिस्तानात बोलवावं, असं ते म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

भारतात जे पीडित मुस्लीम आहेत त्यांना पाकिस्तानचं नागरिकत्व दिलं पाहिजे. आपण अदला-बदली केली पाहिजे. त्या ठिकाणी जे पीडित हिंदू आहेत त्यांनी भारतात आलं पाहिजे आणि इथल्या पीडित मुस्लिमांनी पाकिस्तानात गेलं पाहिजे. पाकिस्ताननंही असा एक कायदा तयार केला पाहिजे, असं सैनी म्हणाले.

सैनी यांचा यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. तर एकानं त्यांना सवाल करत मानसिक आजाराचा सामना करणाऱ्यांनी कुठे जावं असा सवाल केला आहे.