पाकिस्तान हा देश आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र आणि दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याच्या जागतिक पातळीवर सर्वमान्य मुद्दय़ावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशा शब्दात भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर ताशेरे ओढले.
भारतीय प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख महावीर सिंघवी यांनी ‘दी ग्लोबल स्कर्ज ऑफ टेररिझम- असेसमेंट ऑफ हायरिस्क थ्रेट अँड ट्रेंड्स’ या विषयावरील ऑनलाइन परिसंवादात सांगितले की, जग करोनाविरोधात एकत्र येत असताना नेहमीच दहशतवादाचा पुरस्कार करणारा पाकिस्तान भारताविरोधात अपप्रचार करण्याची एकही संधी सोडत नाही. पाकिस्तानने भारतावर केलेले आरोप निराधार व द्वेषमूलक आहेत. आमच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे त्यांचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत.
पाकिस्तानने दहशतवादाविरोधात शाश्वत, निरीक्षणयोग्य अशी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून सिंघवी यांनी म्हटले आहे की, जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असतानाही पाकिस्तानने तो अनेकदा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. सीमेपलीकडून दहशतवादाला लष्करी, आर्थिक साहाय्य करतानाच पाकिस्तान रसद पुरवठाही करीत आहे. दहशतवादी कारवायांना पाकिस्तान स्वातंत्र्य लढा संबोधत आहे. त्याचबरोबर जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या निर्णयावर अपप्रचार करीत आहे.
भारताचा कारभार राज्यघटनेतील तत्त्वांनुसार सुरू असून अल्पसंख्याकांचा आदर केला जात आहे. पाकिस्तान ईश्वरसत्ताकवादी असून भारताचा धर्मनिरपेक्ष वारसा त्यांच्या समजण्यापलीकडे आहे, असे त्यांनी म्हटले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 12:11 am