दहशतवादाविरोधात अमेरिकेने पुकारलेल्या युद्धामध्ये पाकिस्तानने दिलेल्या मदतीबाबत पुनर्विचार करण्यात यावा, असे सांगून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सार्वत्रिक निवडणुकीतील प्रबळ उमेदवार नवाब शरीफ यांनी एक प्रकारे तालिबानशी वाटाघाटींचा मार्गच खुला केला. ९/११च्या भीषण हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात उभ्या ठाकलेल्या अमेरिकेला पाकिस्तानने पाठिंबा दिला. त्यामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला कोटय़वधींची डॉलरगंगा उपलब्ध झाली असून लष्कराला अत्याधुनिक युद्धसामग्री मिळाली. परंतु या युद्धामध्ये हजारो निष्पाप पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेला असल्यामुळे जनतेमध्ये अमेरिकेविषयी तीव्र नाराजी आहे. या नाराजीचे व्होटबँकेमध्ये रूपांतर करण्यासाठी शरीफ सरसावले आहेत.  शरीफ म्हणाले की, बंदुका आणि गोळ्या यांच्या बळावर हा प्रश्न सुटू शकत नाही. इतर पर्यायांवर आपण विचार करायला हवा आणि जो पर्याय शांतता मिळवून देईल, त्याचा स्वीकार करायला हवा. आम्ही इतर पर्यायांचा विचार करीत आहोत. तालिबानसोबत सकारात्मक वातावरणामध्ये चर्चा घडवून समस्या सोडविल्या जाऊ शकतात, असा नवा मुद्दा त्यांनी माडला. या समस्येशी संबंधित सर्वपक्षीयांनी एकत्र बसून सर्वमान्य असा उपाय शोधून काढायला हवा. त्यात पाकिस्तानसोबत आंतरराष्ट्रीय समुदायाचेही हीत आहे, असेही ते म्हणाले.