पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमधून विस्तव जात नाहीये हे वास्तव आहे. अशातच पाकिस्तानचे सैन्य घुसखोरांना पाठिंबा देते आहे, त्यांनी जर तो काढला नाही तसेच देशाच्या कुरापती काढणे सोडले नाही तर पाकिस्तानला सुतासारखे सरळ करू असा इशाराच लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे. देशभरात आज भारतीय सैन्य दलाचा ७० वा सेना दिवस साजरा करण्यात येतो आहे. याच आर्मी डे औचित्य साधत लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे. पाकिस्तानने घुसखोरांना पाठिंबा देणे थांबवले नाही तर आमचा कारवाईसाठी नाईलाज होईल आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू असेही रावत यांनी म्हटले आहे. ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

पाकिस्तानकडून रविवारीच अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्यात आली. तसेच भारताने आमची धमकी पोकळ धमकी समजू नये अशीही प्रतिक्रिया देण्यात आली. हवे असेल तर खुशाल भारताने अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव घ्यावा आम्ही हल्ला करून आमची ताकद काय आहे ते दाखवून देतो असे पाकिस्तानने म्हटले आहे. मात्र या इशाऱ्याची पर्वा न करता पाकिस्तानने कुरापती थांबवल्या नाहीत तर आम्ही पाकिस्तानला सुतासारखे सरळ करू असा इशारा लष्करप्रमुख रावत यांनी दिला.

आर्मी डेचे औचित्य साधत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय लष्कराला शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय लष्कराला शुभेच्छा दिल्या. भारतीय लष्कर म्हणजे देशाचा गौरव आहे. तुम्ही देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखता आहात, तुमच्यावर असलेल्या विश्वासामुळेच प्रत्येक भारतीय नागरिक शांतपणे झोपू शकतो. अशा शब्दात राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर याच दिवसाचे औचित्य साधत बिपीन रावत यांनी पाकिस्तानला इशारा देऊन आपल्या कारवाया थांबवण्याबाबत दम दिला आहे.