पाकिस्तानने आपल्या भूमीतून कारवाया करणाऱ्या दहशतवादी गटांना पाठिंबा देणे थांबवावे तसेच दहशतवाद्यांच्या छावण्या नष्ट कराव्यात, अशा शब्दांत भारताने शनिवारी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समज दिली आणि जैश-ए-महंमदच्या नगरोटा भागातील हल्ल्याच्या कटाचा निषेध नोंदवला.

पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी गटाने जम्मू-काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी केलेल्या हल्ल्याचा भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांकडे निषेध नोंदवला. भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेप्रति वचनबद्ध असून दहशतवादाविरोधात खंबीरपणे लढा देईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्तांना सुनावले.

नगरोटा घटनेनंतर लष्कराने तेथून मोठय़ा प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त केली आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये हल्ला करून अशांतता माजवण्याचा आणि तेथील लोकशाही प्रक्रिया हाणून पाडण्याचा ‘जैश’चा डाव होता, परंतु भारतीय जवानांनी तो पाडला, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

नगरोटा भागात गुरुवारी सकाळी जैश-ए-महंमदचे चार संशयित दहशतवादी ट्रकमध्ये लपून बसले होते. त्यांना ठार करून भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला होता. हल्लेखोर पाकिस्तानातील ‘जैश-ए-महंमद’चे दहशतवादी होते. या संघटनेवर संयुक्त राष्ट्रे तसेच अनेक देशांनी बंदी घातली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

पाकच्या गोळीबारात कोल्हापूरचा जवान शहीद

जम्मू : पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील खेडय़ात केलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्य़ातील निगवे गावचे संग्राम शिवाजी पाटील यांना वीरमरण आले. पाकिस्तानने नौशेरातील लाम भागात गोळीबार केला त्यात ते गंभीर जखमी झाले होते. भारतीय लष्कराने हल्ल्यास प्रत्युत्तर दिल्यानंतर सीमेपलीकडील गोळीबार थांबला.