जर पाकिस्तानने दहशतवाद थांबवला तर लष्करदेखील सुवर्णपदक विजेत्या खेळाडू नीरज चोप्राप्रमाणे वागेल असं वक्तव्य लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केलं आहे. आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने कांस्यपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमसोबत हस्तांदोलन केलं होतं. नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं.

आशियाई क्रिडा स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंचा लष्कराकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना बिपीन रावत यांनी काश्मीरमधील परिस्थिती २०१७ शी तुलना करता चांगली सुधारली असल्याचं म्हटलं आहे.

यावेळी भारत-पाकिस्तान सीमारेषेवर खेळाडू वृत्ती दाखवण्यात येणार का असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘त्यांनी पहिलं पाऊल उचलावं. त्यांनी दहशतवाद थांबवायला हवा. जर त्यांनी दहशतवाद थांबवला तर आम्हीदेखील नीरज चोप्राप्रमाणे वागू’. नीरज चोप्राने पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमसोबत केलेला हस्तांदोलनाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

बिपीन रावत यांनी जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांकडून सुरु असलेली कारवाई सुरु राहणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र सध्या तरुण आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये दहशतवादाचा मार्ग योग्य नसल्याचा विश्वास वाढला असून हे आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो असंही ते म्हणाले आहेत.

‘अनेक ठिकाणी मी महिला त्यांच्या मुलांना दहशतवादाचा मार्ग सोडून घरी परत येण्याचं आवाहन करताना पाहिलं आहे. असंच सुरु राहिलं तर लवकरच दहशतवादाचा प्रश्न मिटेल. तसंच दहशतवादाचा मार्ग स्विकारलेले तरुण घऱी परततील’, असं बिपीन रावत यांनी सांगितलं आहे.