पाकिस्तानात शीख धर्मगुरुंच्या मुलीचं अपहरण करत जबरदस्ती धर्मांतर करुन मुस्लिम तरुणाशी लग्न लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानील शीख समुदायात प्रचंड रोष असून संताप व्यक्त केला जात आहे. भगवान सिंह असं मुलीच्या वडिलांचं नाव असून मोहम्मद एहसान या तरुणाशी जबरदस्ती तिचं लग्न लावून देण्यात आलं. याआधी पाकिस्तानमधील सिंध आणि खायबर-पख्तूनवा प्रांतातून हिंदू आणि शीख तरुणींचं अपहरण करत जबरदस्ती धर्मांतर करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

मुलीच्या कुटुंबीयांनी ट्विटरला व्हिडीओ अपलोड करत घटनेची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडेही मदत मागितली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा मुद्दा जागतिक स्तरावर नेला जावा अशी विनंती केली आहे. धर्मांतर केलं तर तुझ्या कुटुंबीयांना गोळ्या घालून हत्या करु अशी धमकी तिला देण्यात आली होती असा दावा त्यांनी व्हिडीओत केला आहे.

दरम्यान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओत मुलगी डोक्यावर काळा दुपट्टा घेऊन मोहम्मद एहसानच्या शेजारी बसलेली दिसत आहे. मुलगी आपण स्वत:च्या इच्छेने निकाह करत असल्याचं व्हिडीओत सांगत आहे. आपण १९ वर्षाचे असून, वडिलांच्या घरातून कोणतेही दागिने किंवा संपत्तीची कागदपत्रं आणली नसल्याचं मुलगी व्हिडीओत सांगत आहे.

मुलीचा भाऊ मनमोहन सिंग याने मात्र तक्रारीत तिचं वय १६ ते १७ असल्याचं सांगितलं आहे. मनमोहनने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एहसान आणि इतर सहा जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मुलीचा छोटा भाऊ साविंदर सिंग याने २७ ऑगस्टच्या रात्री आपल्या बहिणीचं एहसान आणि इतरांनी मिळून अपहरण केल्याचं सांगितलं आहे.

“आपली बहिण मोठ्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी गेली होती. तिचे पती कामानिमित्त फैसलाबादला गेले होते. यावेळी काहीजणांनी मिळून घरावर हल्ला करत तिचं अपहरण केलं”, अशी माहिती त्याने दिली आहे. तक्रार करुनही पोलिसांनी त्याकडे लक्ष दिलं नसल्याचं कुटुंबाची तक्रार आहे.