पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 218 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सिंध प्रांतात असलेल्या हिंदू अल्पसंख्याक समुदायाच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांविरोधात ईश निंदेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या ठिकाणी दंगल उसळली होती. त्यांनंतर या प्रांतात असेलेल्या हिंदू समुदायाच्या मंदिराची तोडफोड केल्याचा आरोप स्थानिकांकडून आला.

दरम्यान, या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने इस्लामविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकांकडून करण्यात आला. पाकिस्तानामध्ये ईश निंदा हा गुन्हा हा अतिशय गंभीर गुन्हा मानला जातो. त्यानंतर या ठिकाणी दंगल उसळली. तसंच हिंदूंच्या अनेक मंदिरांचीही तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेत शाळेचंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त समोर आली आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून ही दंगल नियंत्रणात आणली.

दरम्यान, यानंतर शांततेच्या नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या युसुफजई मलाला हिला ट्रोल करण्यात येत आहे. यापूर्वी मलाला हिनं काश्मीर प्रश्नी वक्तव्य केलं होतं. काश्मीरमधील सद्य परिस्थितीमुळे मुलींना शाळेत जाता येत नसल्याने आपण निराश असल्याचे तिनं म्हटलं होतं. दरम्यान कर्नाटकातील खासदार शोभा करंदाजे यांनीदेखील मलाला हिच्या ट्विटला रिट्विट करत पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांचा विचार करण्याची विनंती केली होती. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांचे छळ केला जात आहे. परंतु काश्मीरमध्ये नागरिकांचा आवाज दाबण्यात येत नसून विकासाच्या दिशेने पुढे जात असल्याचे त्या म्हणाल्या.