जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या गोळीबारात मारला गेलेला दहशतवादी बुरहान वाणीच्या सन्मानार्थ पाकिस्तानने पोस्टाचे तिकीट जारी केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांच्या गोळीबारात मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे फोटो या तिकीटावर आहेत. काश्मीर स्वातंत्र्यासाठी भारतीय सैनिकांविरोधात लढल्याच्या सन्मानार्थ या दहशतवाद्यांचे फोटो पाकिस्तानच्या पोस्टाने टपालावर छापले आहेत. हा स्टॅम्प e-bay आणि इतर ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्टॅम्पची किंमत ८ रूपये आहे.

पाकिस्तानमधील एका पोस्ट आधिकाऱ्याने असे सांगितले की, २४ जुलै रोजी कराची येथे पोस्ट तिकीट जारी करण्यात आले. काश्मीरमधील जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासाठ हे तिकीट जारी करण्यात आले आहे. कराचीमध्ये पाकिस्तानमध्ये डाक विभागाचे मुख्यालय आहे. लढ्यामध्ये आपण काश्मीरच्या लोकांसोबत असल्याचे दाखवण्यासाठी पाकिस्तानने स्टॅम्पवर बुरहान वाणीसह इतरांचे फोटो छापले आहेत.

८ जुलै २०१६ रोजी अनंतनागमधील चकमकीत ठार झालेला दहशतवादी बुरहान वानीचा उल्लेख या तिकिटावर ‘फ्रीडम आयकॉन’ (१९९४-२०१६) असा केला आहे. रासायनिक शस्त्रांचा वापर, पॅलेट गनचा वापर, सामूहिक कब्र असे शब्दही या तिकिटांवर आहेत. भारतीय लष्कर काश्मीरमधील जनतेवर किती अत्याचार करतंय, असा आभास त्यातून निर्माण करायचा आहे.