अमेरिकेने पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर टीका केली आहे. पाकिस्तानला काश्मीरमधल्या मुस्लिमांच्या स्थितीबद्दल जितकी चिंता वाटते तितकीच कळकळ त्यांनी चीनच्या ताब्यात असलेल्या मुस्लिमांच्या स्थितीबद्दलही दाखवावी असे अमेरिकेने म्हटले आहे. चीनने लाखो उइगर आणि टर्की भाषिक मुस्लिमांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्याबद्दल इम्रान खान का बोलत नाहीत? असा सवाल अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशियाचे विभागाचे सहाय्यक सचिव एलिस वेल्स यांनी विचारला आहे.
पाकिस्तानला काश्मीर इतकीच पश्चिम चीनमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या मुस्लिमांबद्दल चिंता वाटली पाहिजे असे वेल्स यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावरुन तसेच मुस्लिमांच्या स्थितीवरुन पाकिस्तानने भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. एलिस वेल्स यांनी पाकिस्तानला विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. इम्रान खान यांनी स्वत:ला काश्मिरी जनतेचा सदिच्छादूत म्हटले आहे.
चीन मधल्या मुस्लिमांच्या स्थितीवरुन पाकिस्तानने नेहमीच मौन बाळगले आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांना याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ते आपल्या देशात भरपूर काही सुरु आहे असे सांगून उत्तर देण्याचे टाळतात. सोमवारी थिंक टँकच्या कार्यक्रमात इम्रान खान यांना उइगर मुस्लिमांच्या अवस्थेबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट भूमिका घेण्याचे टाळले. पाकिस्तानचे चीन बरोबर खास संबंध आहेत. त्यांच्याबरोबर खासगीमध्ये हा विषय उपस्थित करु असे सांगून इम्रान यांनी उत्तर देण्याचे टाळले.
चीनमधल्या अल्पसंख्यांकांच्या स्थितीवरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा निषेध करण्यात आला आहे. चीनने अनधिकृतपणे आपल्या देशातील मुस्लिमांना ताब्यात ठेवले आहे. पण चीनला हा आरोप मान्य नाही. तिथे आम्ही रोजगाराभिमुख प्रशिक्षण देतो असे चीनचा दावा आहे.
भाषणाआधीच इम्रान खान यांनी मानली हार
संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करण्याआधीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हार मानली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांचे शुक्रवारी संध्याकाळी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भाषण होणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भाषणाबद्दल मी फार आशावादी नाही. यातून फार काही साध्य होईल असे आपल्याला वाटत नाही असे इम्रान खान एका मुलाखतीमध्ये म्हणाले.
इम्रान खान संयुक्त राष्ट्रातील आपल्या भाषणात काश्मीर मुद्दावरुन भारताला लक्ष्य करणार हे स्पष्ट आहे. अमेरिकेत पाऊल ठेवल्यापासून इम्रान खान यांनी भारताविरोधात आघाडी उघडली आहे. काश्मीर मुद्दावर आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळवण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्यामुळे इम्रान खान यांनी याआधी सुद्धा आपली हताशा प्रगट केली होती. काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रात अपेक्षित यश मिळणार नसल्यान ते निराश आहेत असे जिओ न्यूजने म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 27, 2019 4:36 pm