पाकिस्तानमध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार आल्यानंतरही भारतातील दहशतवादी कारवायांसाठी तेथील दहशतवादी गटांना मदत केली जाते. ही माहिती अमेरिकेतील पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि संरक्षणतज्ज्ञ निवृत्त जनरल जॅक किने यांनी तेथील कॉंग्रेसला दिली.
ते म्हणाले, दहशतवादी गटांना रसद पुरवून भारतातील दहशतवादी कारवायांना ते मदत करतात. अमेरिका, नाटो आणि अफगाणिस्तानमध्ये घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठीही हक्कानी नेटवर्क आणि तालिबान्यांना पाकिस्तानकडून मदत केली जाते. या ठिकाणी अद्यापही लष्कराचे तेथील सरकारवर प्राबल्य आहे. सरकारही कमकुवत असून, अर्थव्यवस्थेची स्थितीही चिंताजनक आहे, असे किने यांनी कॉंग्रेसच्या सदस्यांपुढे केलेल्या भाषणामध्ये सांगितले.
‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’ या अमेरिकेतील विचारगटाचे किने सध्या अध्यक्ष आहेत. पाकिस्तानमधील सध्याच्या सरकारकडून अमेरिकेने फारशा अपेक्षा ठेवू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानच्या अंतर्गत भागातील हक्कानी नेटवर्क अमेरिकेने उदध्वस्त केले पाहिजे, अशीही सूचना त्यांनी केली.