पाकिस्तानकडून अणवस्त्रांच्या साठ्यात लक्षणीयरित्या वाढ करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या शस्त्रागारातील अणवस्त्रांचा साठा १३० ते १४० पर्यंत पोहचला आहे. याशिवाय, पाकिस्तानच्या ताफ्यात असणाऱ्या एफ-१६ विमानांनाही ही अणवस्त्रे वाहून नेण्याच्यादृष्टीने सुसज्ज करण्यात आल्याची माहिती अणू शास्त्रज्ञांच्या अहवालात प्रकाशित करण्यात आली आहे. काही व्यवसायिक उपग्रहांनी टिपलेल्या पाकिस्तानी सैन्यतळ आणि हवाई तळांची छायाचित्रे टिपली आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी अणवस्त्रांशी संबंधित असणारे मोबाईल प्रक्षेपक आणि भूमिगत सुविधा उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे.  पाकिस्तानकडून अणवस्त्रांच्या साठ्यात , त्यासाठी लागणाऱ्या प्रक्षेपण व्यवस्थेची आणि सुट्या भागांच्या उत्पादन क्षमतेतही मोठी वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी १९९९ मध्ये वर्तविलेल्या अंदाजापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. २०२० पर्यंत पाकिस्तानच्या अणवस्त्रांची संख्या ६० ते ८० पर्यंत जाईल, असा अमेरिकेचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या १३० ते १४० वर पोहचली आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार पाकिस्तानमधील चार प्लुटोनियम उत्पादन रिअॅक्टर आणि दोन युरेनियम प्रकल्पांचा विस्तार करण्यात आल्या असून आगामी दहा वर्षांत या सुविधांचा आणखी विस्तार होणे अपेक्षित आहे. पाकिस्तानने अणवस्त्रांचे उत्पादन अशाचप्रकारे सुरू ठेवले तर  आगामी दशकात पाकिस्तान तब्बल ३५० अणवस्त्रांसह देशातील तिसऱ्या क्रमांकाचा अणवस्त्रधारी देश होऊ शकतो.