भारताने अग्नी-५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची कॅनिस्टर चाचणी यशस्वी केल्यानंतर आता पाकिस्तानने स्वदेशी बनावटीच्या राद या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली. त्याचा पल्ला साडेतीनशे किलोमीटरचा असून अनेक भारतीय शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात.
 राद क्षेपणास्त्र अण्वस्त्रे व पारंपरिक अस्त्रे वाहून नेऊ शकते. सागर व जमिनीवरून ते उडवता येते. त्यात क्रूझ तंत्रज्ञान वापरलेले असून ते काही मोजक्याच देशांकडे आहे त्यात पाकिस्तान एक आहे, असा दावा करण्यात आला. पाकिस्तानचे राद क्षेपणास्त्र कमी उंचीवरून जाणारे पण अचूक क्षेपणास्त्र आहे असे  लष्कराने सांगितले.
सामरिक योजना विभागाचे लेफ्टनंट जनरल झुबेर महमूद हयात यांनी वैज्ञानिक व अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. पाकिस्तानच्या तांत्रिक प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली. अध्यक्ष ममनून हुसेन व पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाणाचे स्वागत केले असून वैज्ञानिक व अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.