भारत – पाकिस्तान वादावर सीमेवर बंकर तयार करणे हा काही तोडगा नाही. दोन्ही देशांमध्ये खूप युद्ध झाले. मात्र, आता दोन्ही देशांनी एकत्र येऊन गरिबी, रोगराई आणि निरक्षरतेविरोधात लढा द्यावा, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यात मोदींनी पाक धोरणाबाबत भाष्य केले होते. भारत- पाकिस्तानने एकत्र येऊन गरिबीविरोधात लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी पाकला केले होते. याच विधानाचा दाखला देत मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला आवाहन केले आहे. पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला मनावर घ्यावे. एकमेकांशी युद्धात लढण्याऐवजी दोन्ही देशांनी एकत्र येऊन गरिबीविरोधात लढा द्यायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.दोन्ही देशांमधील युद्ध आता पुरे झाले, असा मला नेहमीच वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. सीमेवरील शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना वाढल्या असून या पार्श्वभूमीवर त्या विधानसभेत बोलत होत्या. दोन्ही देशांनी सीमेवर बंकर बांधण्यासाठी ऐवजी एकमेकांना साथ देणे कधीही चांगलेच. गरिबी, रोगराई आणि निरक्षरतेविरोधात लढा दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यातही मुफ्ती यांनी भारत- पाकमधील वादात सर्वसामान्यांचा बळी जातो असे विधान केले होते. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील गावात राहणाऱ्या १० हजार ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.