भारताच्या अग्नी क्षेपणास्त्राला शह देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हत्फ क्षेपणास्त्राच्या चौथ्या आवृत्तीची यशस्वी चाचणी बुधवारी पाकिस्तानने घेतली. हत्फ-४ क्षेपणास्त्राचा पल्लाा ९०० किलोमीटरचा असून उत्तर भारतातील सर्व प्रमुख शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. हत्फ-४ क्षेपणास्त्राची बुधवारी सकाळी कराची बंदराजवळ यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे पाकिस्तानी लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले. ही चाचणी कोणत्याही देशाला लक्ष्य करण्यासाठी नसून पाकिस्तानचे सुरक्षाकवच अधिकाधिक बळकट करण्यासाठी असल्याचे लष्करी सूत्रांनी म्हटले आहे. हत्फ-४ पारंपरिक अस्त्रांबरोबच अण्वस्त्रेही वाहून नेण्याची क्षमता राखते. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने सातत्याने हत्फच्या विविध श्रेणीतील क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे.