तालिबानी गटाचा प्रमुख हकीमुल्ला मेहसूद याला ठार मारून अमेरिकेने जाणूनबुजून शांतता चर्चेत खोडा घातला आहे, असा आरोप पाकिस्तानने केला असतानाच पाकिस्तानी तालिबानी दहशतवादी गटाने दहशतवाद्यांसाठी सुरक्षित स्थळ निर्माण केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या गटाचे अल् काइदासमवेत अत्यंत निकटचे संबंध होते, असे अमेरिकेने म्हटले आहे. हकीमुल्ला मेहसूद हा ‘वॉण्टेड’ होता, असेही अमेरिकेने स्पष्ट केले.
उत्तर वझिरिस्तानच्या आदिवासी क्षेत्रावर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात हकीमुल्ला ठार झाल्याच्या वृत्ताला आपण दुजोरा देऊ शकत नाही. मात्र, हकीमुल्ला हा  तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचा कमाण्डर होता, असे येथील अमेरिकी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याखेरीज तेहरीक-ए-तालिबान आणि अल् काइदा या संघटनांचे अत्यंत निकटचे संबंध असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला. तेहरीक-ए-पाकिस्तान या संघटनेला अल् काइदाकडून वैचारिक मार्गदर्शन मिळते तर पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरील पश्तुन भागात सुरक्षित स्थान मिळावे म्हणून अल् काइदा ‘तेहरीक’ वर अवलंबून असते, असे दूतावासाचे हंगामी प्रवक्ते संदीप पॉल यांनी सांगितले.
दरम्यान, हकीमुल्ला याला ठार मारण्यात आल्यानंतर अमेरिकेसमवेत असलेल्या संबंधांचा फेरविचार पाकिस्तानकडून केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.