जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर कृष्णा घाटी सेक्टरमध्ये मंगळवारी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय लष्कराच्या तळावर रॉकेट लाँचरने हल्ला केला. सीमेपलीकडे जीवितहानी होऊ नये यासाठी भारतीय लष्कराने जाणीवपूर्वक चिथावणी देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्याला उत्तर दिले नाही असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळी १०.३० च्या सुमारास झुलास भागात लष्करी तळाच्या दिशेने हे रॉकेट डागण्यात आले होते. पण कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारतीय लष्कराला चिथावणी देण्याच्या उद्देशाने हा रॉकेट हल्ला करण्यात आला होता. भारताने प्रत्युत्तर दिले असते तर सीमेपलीकडे जीवितहानी होऊ शकली असती असे या अधिकाऱ्याने सांगितले.

नवीन वर्ष सुरु झाल्यापासून जम्मू भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरही शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर १५ जानेवारीला पाकिस्तानी स्नायपरच्या हल्ल्यात बीएसएफचे सहाय्यक कमांडट विनय प्रसाद शहीद झाले होते. भारत-पाकिस्तान सीमेवर २०१८ मध्ये मागच्या पंधरा वर्षातील शस्त्रसंधी उल्लंघनाच्या सर्वाधिक २,९३६ घटना घडल्या आहेत.