पाकिस्तानच्या नौदलाने अरबी समुद्राच्या उत्तर भागात एका क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. ‘एअर टू सरफेस’ अर्थात हवेतून जहाजाकडे मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. अँटी शिप मिसाईलची (जहाज नष्ट करणारे क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राची चाचणी एका हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आली असल्याची माहिती पाकिस्तानच्या नौदल अधिकाऱ्याने दिली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील बातमी दिली आहे.

पाकिस्तान नौदलामध्ये क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरल्याने उत्साहाचे वातावरण आहे. हेलिकॉप्टरद्वारे या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आल्याने आम्हाला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी चांगली मदत होऊ शकणार आहे असेही नौदलाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या युद्ध क्षमतेला या चाचणीमुळे वेगळी उंची लाभली आहे असेही नौदल अधिकारी जकाउल्लाह यांनी म्हटले.

एकीकडे उत्तर कोरियाने अमेरिकेला आव्हान दिले आहे. त्यानंतर इराणनेही कोणताही विरोध न जुमानता मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली. या घडामोडींना काही कालावधी उलटतो न उलटतो तोच  पाकिस्तानकडूनही क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या सैन्याचे बळ यामुळे वाढले असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.  त्यामुळे याबाबत भारताकडून काही भूमिका घेतली जाते का? याकडे जगाचे लक्ष लागले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.