पाकिस्तानला पाणबुडीतून सोडल्या जाणाऱ्या पहिल्या आण्विक क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात यश आले आहे. पाकिस्तानी लष्कराकडून सोमवारी यासंदर्भातील माहिती देण्यात आली असून या क्षेपणास्त्राचे नाव बाबर-३ असे आहे. अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले बाबर-३ हे क्षेपणास्त्र ४५० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. हे क्षेपणास्त्र पाण्याखाली नियंत्रणासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक दिशादर्शक आणि मार्गदर्शन प्रणालीने सज्ज आहे. दरम्यान, बाबर-३ च्या यशस्वी चाचणीमुळे आगामी काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आण्विक शस्त्रांची स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. विश्वासार्ह किमान शक्ती संतुलनाच्या धोरणाच्या दृष्टीकोनातून हे यश अत्यंत महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय सागरातील अज्ञात ठिकाणी ही चाचणी पार पडली. समुद्राखालील कृत्रिम लाँचपॅडवरून सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यभेद केला. बाबर-३ ही जमिनीवरून मारा करणाऱ्या बाबर-२ या क्षेपणास्त्राची विकसिती आवृत्ती आहे. डिसेंबर महिन्यात बाबर-२ ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. गेल्यावर्षी भारताच्या क्षेपणास्त्रविरोधी मिसाईल्सच्या चाचणीमुळे पाकिस्तानच्या चिंतेत भर पडली होती. भारताने विकसित केलेल्या ही क्षेपणास्त्रे अणवस्त्रे वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांना उद्ध्वस्त करू शकतात, अशी चर्चा आहे.

दरम्यान, बाबर-३ च्या यशस्वी चाचणीनंतर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, भारताने यापूर्वीच म्हणजे २००८ मध्येच पाणबुडीवरून सोडण्यात येऊ शकणाऱ्या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. याशिवाय, २०१३ मध्ये भारताने पाणबुडीवरून डागण्यात येणारे क्रुझ क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश मिळवले होते. काही दिवसांपूर्वीच भारताने संपूर्ण चीनला टप्प्यात आणणाऱ्या अग्नी-४ व अग्नी-५ या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली होती. याबाबत चीनने नाराजी व्यक्त करताना भारताने अण्वस्त्रे आणि लांबपल्ल्याची क्षेपणास्त्रे याबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या मर्यादा ‘तोडल्या’ असून, पाकिस्तानलाही हाच विशेषाधिकार’ दिला जायला हवा असे म्हटले होते. ५ हजार किलोमीटरचा मारा करण्याची क्षमता असलेले अग्नी-५ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र चीनच्या मुख्य भूमीवरील सर्व भागांपर्यंत पोहचू शकत असल्यामुळे त्याचे वर्णन चीनला लक्ष्य करणारे सामरिक महत्त्वाचे क्षेपणास्त्र असे केले जात आहे.