नवी दिल्ली : आर्थिक कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) घातलेल्या बंधनांपैकी सहा महत्त्वपूर्व बाबींसंबंधात निर्णय घेण्यास असमर्थ ठरल्याने पाकिस्तानचा एफएटीएफच्या करडय़ा यादीतील (ग्रे लिस्ट) समावेश कायम राहण्याची शक्यता आहे, असे संकेत रविवारी अधिकाऱ्यांनी दिले.

मौलाना मसूद अझर आणि हाफीज सईद या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई न करणे आणि अधिकृत यादीतून चार हजारांहून अधिक दहशतवाद्यांची नावे अचानक गायब होणे या प्रकारांमुळे पाकिस्तानचा करडय़ा यादीतील समावेश कायम राहण्याची शक्यता आहे.

एफएटीएफची बैठक २१ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून त्यावेळी मनीलॉण्डरिंग आणि दहशतवादाला आर्थिक साहाय्य करणे या प्रकारांना आळा घालण्याबाबत पाकिस्तानने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात येणार आहे आणि पाकिस्तानचा करडय़ा यादीतील समावेश कायम ठेवण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

दहशतवादाला होणारे आर्थिक साहाय्य थोपविण्यासाठी एफएटीएफने पाकिस्तानला २७ कलमी कृती योजना दिली होती त्यापैकी २१ कलमांची पाकिस्तानने पूर्तता केली, परंतु महत्त्वाच्या सहा निर्णयांबाबत कृती केलेली नाही, असे याबाबतच्या घडामोडींची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद आणि दहशतवादी संघटनेचा कमांडर झाकीऊर रेहमान लखवी या संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध पाकिस्तानने कारवाई केलेली नाही. त्याचप्रमाणे दहशतवाद्यांच्या यादीत प्रथम ७६०० जणांची नावे होती त्यामधील चार हजारांहून अधिक दहशतवाद्यांची नावे गायब झाली असल्याची बाबही एफएटीएफने निदर्शनास आणून दिली आहे.