आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी आपली चूक सुधारण्यास मजबूर झालेला पाकिस्तान आता स्वतःला एक जबाबदार देश म्हणत आहे. आयसीजेने भारताच्या बाजूने निकाल दिल्याच्या २४ तासांनंतरच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी रात्री उशीरा एक निवेदन प्रसिद्ध केलं. ज्यात म्हटले आहे की, आम्ही आमच्या देशाच्या कायद्यानुसार भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळवून देऊ. यासाठी कार्यप्रणीलीवर काम सुरू आहे. सलग १६ वेळा पाकिस्तानने कुलभूषण यांना कायदेशीर मदत देण्यास भारताला नकार दिला होता. अखेर भारत आसीजेमध्ये गेल्यानंतर पाकिस्तानला सगळ्या जगासमोर तोंडावर पडावं लागलं.

पाकिस्तानी मंत्रालयाकडून हे देखील सांगितले गेले की, कुलभूषण जाधव यांना व्हिएन्ना कररानुसार त्यांच्या अधिकारांची माहिती करून देण्यात आली आहे. तसेच, एक जबाबदार देशाच्या नात्याने पाकिस्तानी कायद्याप्रमाणे आणि व्हिएन्ना कराराला बांधिल राहून आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत कुलभूषण जाधव यांना मिळवून दिली जाईल, ही मदत कशी मिळवून द्यायची यासाठीचे नियोजन केले जात आहे.

पाकिस्तानने व्हिएन्ना करारचे उल्लंघन केले असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले होते. कुलभूषण जाधव यांना त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर मदत मिळवून द्यायला हवी होती. मात्र तसे न करताच पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.