पाकिस्तानात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार केला जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षातील नेते आमीर लियाकत हुसैन बुरहान वानीची भूमिका निभावणार आहेत. आमीर लियाकत एका प्रसिद्धी टीव्ही शोचे सुत्रसंचालक देखील आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयूब खोसा करणार आहेत. पाकिस्तानात धार्मिक कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणारे आमीर लियाकत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात.

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अयूब खोसा यांनी सांगितलं की, ‘काश्मीरवर आधारित एका विषयावर चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतला आहे. बॉलिवूडमध्ये जो काश्मीर दाखवला जातो त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चर्चा होते. परंतु स्थानिक काश्मिरी चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होताना दिसत नाही’.

हिजबुल कमांडर बुरहान वानी २०१६ मध्ये चकमकीत मारला गेला होता. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आमीर लियाकत यांनी चित्रपटात मुख्य भूमिका निभावत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी बुरहान वानी एक खरा हिरो असल्याचंही म्हटलं. ‘मी चित्रपटात बुरहान वानीची भूमिका निभावणार आहे. मी हिरो आहे असं मला वाटत नाही. पण काश्मिरी जनतेसाठी बुरहान वानी खरा हिरो होता’, असं आमीर लियाकर यांनी सांगितलं आहे.