आर्थिक संकटांचा सामना करावा लागणाऱ्या पाकिस्तानने अवकाशात अंतराळवीर पाठवण्याचा दावा केला. भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेवरुन गरळ ओकणारे पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी पाकिस्तान २०२२ पर्यंत चीनच्या मदतीने अवकाशात पहिला अंतराळवीर पाठवणार असल्याचं सांगितलं आहे. या मोहिमेची तयारी सुरु झाली असून २०२० मध्ये अवकाशात पाठवण्यासाठी अंतराळवीर निवडण्याचं काम सुरु केलं जाईल असं सांगितलं आहे.

इम्रान खान यांच्या सरकारमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधऱी यांनी अवकाश मोहिमेसाठी चीन मदत करत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “सुरुवातीला या मोहिमेसाठी ५० जणांची निवड करण्यात येईल. यानंतर पुढच्या टप्प्यात यापैकी २५ जणांचा समावेश कऱण्यात येईल. शेवटी फक्त एका अंतराळवीराची निवड करण्यात येईल. या सर्व प्रक्रियेत पाकिस्तान हवाई दल मुख्य भूमिका बजावणार आहे”.

याआधी जेव्हा पाकिस्तानने अंतराळ मोहिमेसंबंधी सांगितलं होतं तेव्हा त्यांच्याच नागरिकांनी त्यांना ट्रोल केलं होतं. पाकिस्तानी नागरिकांनी या मोहिमेची माहिती सोशल मीडियावर जाहीर करण्यास सांगितलं होतं.

चांद्रयान-२ वर करुन फसले होते फवाद चौधरी
चांद्रयान-२ मोहिमेवर टीका केल्याने फवाद चौधऱी चांगलेच ट्रोल झाले होते. मोदीजी सॅटेलाईट कम्युनिकेशनवर भाषण देतायत. खरंतर हे राजकीय नेते नसून अंतराळवीर आहेत. एका गरीब देशाचे ९०० कोटी रूपये मातीत घातल्याबद्दल लोकसभेनं मोदींना जाब विचारला पाहिज असं ट्विट त्यांनी केलं होतं. एका भारतीयाच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी, आता झोपी जा…चंद्राऐवजी मुंबईत उतरलं आहे तुमचं खेळणं असं म्हटलं होतं. फवाद चौधरी यांच्या या ट्विटवर लोक तुटून पडले होते. भारतीयांसोबत काही पाकिस्तानी नागरिकांनीही त्यांना चांगलंच झापलं होतं.