कराची : पाकिस्तानातील दक्षिणेकडच्या सिंध प्रांतात दोन प्रवासी रेल्वे गाडय़ांची सोमवारी सकाळी टक्कर होऊन किमान ५० ठार तर  ७० जण जखमी झाले आहेत.

मिल्लत एक्स्प्रेस कराचीहून सारागोधा कडे येत होती, ती विरुद्ध बाजूच्या मार्गावर जाऊन उलटली,  त्याचवेळी तिची टक्कर सर सय्यद एक्स्प्रेसशी झाली. ही गाडी रावळपिंडीहून कराचीकडे जात होती, असे पाकिस्तान रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. लष्कर व निमलष्करी दले मदतकार्य करीत आहेत.  या अपघातात मिल्लत एक्स्प्रेसचे डबे धारकी येथे उलटलेले होते, हे ठिकाण सिंधमधील घोटकी जिल्ह्यात आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे, की या अपघाताचे वृत्त ऐकून धक्का बसला.

जिओ न्यूजला घोटकी येथील उपआयुक्त उस्मान अब्दुल्ला यांनी सांगितले, की १३ ते १४ डबे घसरलेले असून सहा ते आठ डब्यांचा चुराडा झाला आहे. अनेक लोक अडकून पडले असून त्यांना बाहेर काढणे हे एक आव्हान आहे. घोटकीचे  पोलीस अधीक्षक उमर तुफैल यांनी सांगितले, की काही डब्यात प्रवासी अडकले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काही जणांनी ढिगाऱ्यातून बाहेर काढत असताना प्राण सोडले. दोन्ही गाडय़ांमध्ये मिळून एकूण १००० प्रवासी होते. वीस प्रवासी अजून अडकलेले असून दोन्ही रेल्वेतील प्रवाशांची माहिती घेण्यात येत आहे.