पाकिस्तानचा खोडा
भारतात येण्यासाठी अफगाणी वाहनांना वाघा बॉर्डरवरून प्रवेश देण्याची अफगाणिस्तानची मागणी फेटाळून लावत पाकिस्तानने शेजारी देशांवरील अविश्वासाचे प्रदर्शन घडविले. पाकिस्तानच्या या आडमुठय़ा भूमिकेमुळे पाक-अफगाण व्यापारी संबंधांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अफगाणिस्ताननेही पाकिस्तानच्या या कृतीचे उट्टे काढत आपली ताजिकिस्तानची सरहद्द पाकसाठी खुली करण्यास नकार दिला आहे.
दोन्हीही देशांच्या संयुक्त आर्थिक आयोगाची दहावी बैठक इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी उभय पक्षांदरम्यान केवळ नव्या व्यापारीसंबंधांचा आराखडा तयार करण्यासंदर्भात चर्चा होऊ शकली. सरहद्दींवरील प्रवेशाबाबत पाकिस्तानने ताठर भूमिका स्वीकारल्याने त्या संदर्भात कुठलाही निर्णय होऊ शकला नाही.
अफगाणी ट्रक्सना भारतात प्रवेशासाठी वाघा-अटारीमार्गे प्रवेश द्यावा, अशी विनंती अफगाणिस्तानने पाकिस्तानला केली होती.
पण सुरक्षेचे कारण पुढे करीत पाकिस्तानने ती नाकारली. तसेच काबूलला परतणाऱ्या अफगाण ट्रक्सना वाघा येथे माल भरण्याची परवानगी देण्याचीही मागणी फेटाळली.
सध्या अफगाण ट्रक आपला माल वाघा येथे उतरवून काबूलला रिकामे परततात. बैठक झाल्यानंतर अफगाणिस्तानचे अर्थमंत्री इकलील अहमद हाकिमी व पाकिस्तानचे अर्थमंत्री इसाक दार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी अफगाणिस्तानचे पंतप्रधान अश्रफ घानी यांनी आपल्या इस्लामाबाद भेटीदरम्यान पाकिस्तानसोबत जो ४८ कलमी मसुदा ठरवला होता, त्याच्या अंमलबजावणीत तफावत असल्याची तक्रार हाकिमी यांनी केली. तत्पूर्वी दोन्ही देशांनी जारी करावयाच्या संयुक्त निवेदनात वापरण्यात आलेली भाषा अफगाणिस्तानला खटकल्यामुळेही त्यांनी हरकत नोंदवली होती. त्यामुळे पत्रकार परिषदेला तासभर उशीर झाला. तसेच त्याहीअगोदर या बैठकीचा कालावधी दोन दिवसांवरून एका दिवसावर आणण्यात आला होता.