दहशतवादाचा धोरणासारखा वापर करुन अतिरेक्यांना सुरक्षित आश्रयस्थळ उपलब्ध करुन देत असल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. “गुन्हेगाराला सरकारचे पाठबळ असेल तर मोठे आव्हान निर्माण होते. काही सरकारे यामध्ये माहीर आहेत. आमच्याबाबतीत पाकिस्तानने दहशतवाद हे त्यांचे धोरण बनवले आहे” असे डोवाल म्हणाले. ते राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यक्रमात बोलत होते.

“पॅरिसमध्ये सुरु असलेल्या फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या बैठकीचा पाकिस्तानवर प्रचंड दबाव आहे. पाकिस्तानला त्यांच्या भूमीवरुन चालणाऱ्या दहशतवादी कारवाया बंद कराव्या लागतील असे अजित डोवाल म्हणाले. एफएटीएफमुळे पाकिस्तानवर आज मोठा दबाव आला आहे. दुसऱ्या कुठल्या कारवाईमुळे त्यांच्यावर आला नसता इतका दबाव एफएटीएफमुळे आला आहे” असे डोवाल यांनी सांगितले.

सध्याच्या परिस्थितीत कुठल्याही देशाला युद्ध परवडणारे नाही. त्यामध्ये प्रचंड आर्थिक आणि मानवी बळ खर्ची पडेल आणि कोणालाही युद्धात विजयाची खात्री देता येत नाही असे डोवाल म्हणाले. दहशतवाद हा कमी खर्चिक पर्याय असून यामध्ये शत्रूचे मोठया प्रमाणावर नुकसान करता येते असे डोवाल पाकिस्तानचा उल्लेख करुन म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद मोडून काढण्यासाठी केलेल्या कारवाईबद्दल अजित डोवाल यांनी एनआयएचे कौतुक केले. कुठल्याही अन्य यंत्रणेपेक्षा एनआयएने काश्मीरमधल्या दहशतवादावर मोठा परिणाम केला आहे असे डोवाल यांनी सांगितले.