जयशंकर यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय समुदायाकडे थयथयाट

इस्लामाबाद : भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची जी युद्धपिपासू भाषा केली आहे त्याची आंतरराष्ट्रीय समुदायाने दखल घ्यावी कारण अशा वक्तव्यांनी तणावाची परिस्थिती आणखी चिघळून प्रादेशिक शांतता धोक्यात येईल, असे म्हणत पाकिस्तानने भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या वक्तव्यावर थयथयाट केला.

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे व त्याचा आम्ही एक दिवस ताबा मिळवल्याशिवाय राहणार नाही. काश्मीर बाबत इतर लोक काहीही बोलत असतील तरी एका मर्यादेपलीकडे त्याची तमा बाळगण्याचे कारण नाही. काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे व त्यावर भारताची भूमिका स्पष्ट आहे व त्यात बदल होणार नाही, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मंगळवारी केले होते.

मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर जयशंकर यांची ही पहिलीच पत्रकार परिषद होती, त्यात त्यांनी पाकिस्तान हा सीमेपलीकडील दहशतवाद थांबवून सर्वसाधारण देशांप्रमाणे वागत नाही तोपर्यंत ते एक आव्हानच असल्याचे म्हटले होते.

यापुढे पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होईल, काश्मीरवर नाही, असे वक्तव्य काही भारतीय नेत्यांनी केले होते; त्यावर जयशंकर यांनी असे सांगितले की, आमची भूमिका ठाम आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे व एक दिवस आम्ही त्याचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही.

जयशंकर यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने म्हटले आहे की, भारताने केलेले हे विधान आक्रमक व युद्धपिपासू स्वरूपाचे असून त्याची आंतरराष्ट्रीय समुदायाने दखल घ्यावी. अशी बेजबाबदार व आक्रमक विधाने तणाव पसरण्यास कारण ठरत आहेत, त्यामुळे शांतता धोक्यात येईल यात शंका नाही.  भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या या बेजबाबदार व प्रक्षोभक वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. काश्मीरमध्ये भारताने मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ताशेरे ओढले गेल्याने नैराश्यातून भारताने हे वक्तव्य केले. काश्मीरमध्ये निरपराध लोकांवर अत्याचार होत असून त्यावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष उडवण्याचे भारताचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. पाकिस्तानला शांतता हवी आहे, पण जर भारताने आक्रमणाची कृती केली तर आम्ही  सडेतोड उत्तर देऊ.