पाकिस्तानमधून समाजमाध्यमांद्वारे चिथावणी

मुंबई : काश्मीरमधील घडामोडींच्या निमित्ताने पाकिस्तानने समाजमाध्यमांचा वापर करत भारतीयांना चिथावण्याचा प्रयत्न आरंभल्याचे निरीक्षण सायबर यंत्रणांनी नोंदवले आहे. या यंत्रणांनी समाजमाध्यमांवर लावलेल्या चाळणीत मंगळवारी ‘मोदी किलिंग काश्मिरीज’ या हॅशटॅगसह दीड लाखांहून अधिक चिथावणीखोर ट्वीट्स सापडली. ही सर्व ट्वीट्स पाकिस्तानच्या विविध भागांतून टप्प्याटप्प्याने करण्यात आल्याचे संशोधनानंतर स्पष्ट झाले.

सीमेपलीकडून दहा मिनिटांत ३५८ या वेगाने अशी ट्वीट्स भारतात आदळली. ती एका क्षणात सुमारे ४ लाख ट्विटर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यावर २७ हजार ‘रिट्वीट’ आले आणि ७५ हजार ‘लाइक्स’ प्राप्त झाले. त्यावरून मूळ ट्वीट (१२.५ टक्के) कमी, रिट्वीटचे (८६ टक्के) प्रमाण अधिक असल्याची नोंद झाली. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवरूनही अशा हॅशटॅगसह चिथावणीखोर प्रतिक्रियांचा धडाका सुरूच राहिला.

काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या हालचाली सुरू होताच त्याचे पडसाद समाजमाध्यमांवर उमटू लागले. दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सायबर यंत्रणांवर महत्त्वाची जबाबदारी होती. या मोहिमेत सायबर महाराष्ट्र महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाने केलेल्या निरीक्षणानुसार गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरसह अन्य समाजमाध्यमांवरून या निर्णयाविरोधातील प्रतिक्रियांमध्ये वाढ झाली.

विरोधातील बहुतांश प्रतिक्रिया पाकिस्तानच्या इस्लामाबाद, कराची, लाहोर, पंजाब प्रांत, सियालकोट, मुलतान, पेशावर अशा  विविध भागांमधून समाजमाध्यमांवर जाहीर झाल्या. आयपी अ‍ॅड्रेस मिळताच ही बाब स्पष्ट झाली. यापैकी अनेक प्रतिक्रियांमध्ये काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराकडून घडलेल्या तथाकथित अत्याचाराचा उल्लेख आहे.

बनावट खात्यांचा वापर  : एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार यापैकी बहुतांश ट्वीट पाकिस्तानात तयार करण्यात आलेल्या बनावट खात्यांवरून आले आहेत. काही खात्यांवरील नावे भारतीय वाटावीत, अशी आहेत. या निर्णयाविरोधात ठरावीक समाजमने वळवण्याचा, चिथावण्याचा हा प्रयत्न असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र सायबर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवले.