भारताने अद्दल घडवूनही अद्याप पाकिस्तान वठणीवर आलेला नाही. पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरु आहे. बुधवारी भारतीय हद्दीत विमानं घुसवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर आता पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चर्चेसाठी याचना करत दुसरीकडे शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तान दुटप्पी धोरण अवलंबत आहे.

पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पाकिस्ताकडून गोळीबार करण्यात आला. मात्र भारतीय सैन्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिलं. याआधी सकाळीही पाकिस्तानकडून अशाच प्रकारे कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं.

सकाळी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बेसुमार उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. भारतीय लष्करानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. सकाळी ६ ते ७ असा सुमारे एक तास हा प्रकार सुरू होता. दरम्यान, सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

संरक्षण दलाचे प्रवक्ते ले.कर्नल देवेंदर आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट आणि मानकोट परिसराजवळ सीमेपलीकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला. सकाळी ७ वाजता हा प्रकार थांबला. यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही. भारतीय सैन्यदलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळावर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामुळे सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.