जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. अनेक ठिकाणी प्रयत्न केल्यानंतरही या प्रकरणी पाकिस्तान तोंडावर पडला आहे. त्यानंतर आता बिथरलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. मंगळवारी पाकिस्तानने पूंछमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गोळीबार केला. याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ ए रद्द केले. या निर्णयाने पाकिस्तानला जोरदार झटका बसला असून, त्यानंतर मिळेल त्या मार्गाने रोष व्यक्त करणे पाकने सुरू केले आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा मंगळवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.

यापूर्वी १५ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. १७ ऑगस्ट रोजी सकाळी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरममध्ये भारतीय चौक्यांना पाककडून लक्ष्य करण्यात आले होते. तसेच पाकिस्ताने गोळीबारासह उखळी तोफांचा मारा केला. सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराच्या लान्स नाईक संदीप थापा यांना वीरमरण प्राप्त झाले होते. तसेच स्वातंत्र्यदिनीही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. कृष्णा घाटी सेक्टरमधील सीमेनजीक असलेल्या गावांना पाक लष्कराकडून निशाणा बनवण्यात आले होते.