जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात शनिवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. मेंढार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रकिया बी असं या महिलेचं नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्यानं उखळी तोफांचा मारा केला तेव्हा रकिया घरात होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रकियाचा जागीच मृत्यू झाला.

 

 

शनिवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं बेधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. तसंच उखळी तोफांचाही मारा केला. मेंढार सेक्टरमधील गोहलाड कालरानमध्ये घरांवर उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात रकिया बी या महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनिष मेहता यांनी दिली. गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. पावणेसातच्या सुमारास दोन्ही बाजूंनी सुरू असलेला गोळीबार थांबला, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, कुपवाडातील कालारुसच्या जंगल परिसरातील ४२ राष्ट्रीय रायफल्सच्या मुख्यालयावर शुक्रवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात एक जवान गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला लष्कराच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्करानं मोहीम हाती घेतली आहे.