संजुवन लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आता अधिक कडक धोरण अवलंबण्याच्या पवित्र्यात असून वारंवार पुरावे सादर करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल, असा गर्भित इशाराच संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिला आहे. संजुवनमधील लष्करी मोहिम संपल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

सीतारामण यांनी सांगितले की, संजुवनमधील हल्ला हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने घडवून आणला आहे. भारत पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येकवेळी पुरावा देत आहे. मात्र, याची फिकीर पाकिस्तानला नाही त्यामुळे त्यांना आता याची किंमत चुकवावी लागेल.

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, संजुवन हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानशी जाऊन मिळतात. कारण पाकिस्तानातूनच या हल्ल्याचा कट रचन्यात आल्याची माहिती गुप्तचरविभागाला मिळाली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानातून आलेल्या या दहशतवाद्यांना काश्मीरच्या स्थानिक नागरिकांनी मदत केली असण्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली.

पाकपुरस्कृत दहशतवाद आता पीर पंजाल रेंजच्याही पुढे चालला आहे. त्याचबरोबर भारतात दहशतवाद्यांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप सीतारामण यांनी केला आहे. भारत हा पाकपुरस्कृत दहशतवाद नेहमीच मोडीत काढणार. या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) सोपवण्यात आली असून लवकरच ते याबाबतचा अहवाल देतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हल्ल्यात झालेल्या नुकसानीची माहिती देताना सीतारामण म्हणाल्या, चकमकीत ५ जवान शहीद झाले असून एका नागरिकालाही जीव गमवावा लागला आहे. भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरात लष्काराने ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गुप्तचरांच्या माहितीनुसार ४ दहशतवादी येथे घुसले होते. मात्र, चौथा दहशतवादी हा गाईड बनून आला असावा, तो या तळावर गेला नसेल अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली