पाकिस्तानात आता विभाजनवादी चळवळी जोर धरु लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही. पुढील काही वर्षात लाहोरमध्ये आपण महात्मा गांधीजींची जयंती साजरी करु, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. काश्मिरींना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातील मुझ्झफराबाद येथे रॅली काढण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया देताना संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले.

इंद्रेश कुमार म्हणाले, “सन १९४७ पूर्वी पाकिस्तान हा जगाच्या नकाशावर नव्हता आणि मला विश्वास आहे की पुन्हा पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही. त्यामुळे भविष्यात आपण लाहोरमध्ये बापू जयंती आणि हिंदी दिवस साजरु शकतो” आपला मुद्दा विस्ताराने सांगताना ते म्हणाले, “भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यानंतर १९७१मध्ये पाकिस्तानची फाळणी झाली. आजही पाकिस्तानचे ५ ते ६ भागात तुकडे पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पश्तूनिस्तान, बलुचिस्तान, सिंध या प्रांतांना पाकिस्तानपासून वेगळं व्हायचं आहे. त्यामुळे पाकिस्तान दिवसेंदिवस कमजोर बनत चालल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे दोन भारताचे भाग असून ते पुन्हा मिळवण्यात येतील अशी विधाने केली आहेत. या पार्श्वभूमीवर संघाने हे विधान केले आहे. आरएसएसमधील ‘प्रचारका’च्या धर्तीवर काँग्रेसने मांडलेल्या ‘प्रेरक’ या कल्पनेवरही इंद्रेशकुमार यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये कधीही प्रचारक असू शकत नाहीत कारण त्यासाठी निष्ठा आणि त्यागाची गरज असते. प्रचारक हे एक ध्येय आहे आणि जर तुम्हाला धेय नसेल तर तु्म्ही जगू शकत नाही. काँग्रेसकडे पूर्वी स्वातंत्र्याचे ध्येय होते मात्र ते पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस पक्ष फाळणीला कारणीभूत ठरला. आता तर काँग्रेस भ्रष्ट आणि गुन्हेगारी कारवायांना प्रसिद्धी देतंय अशा शब्दांत इंद्रेशकुमार यांनी काँग्रेसवर टीका केली.