पाकिस्तानमधील बालाकोट भागात भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर, पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली होती. पाकिस्तानने आता ही बंदी 30 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पाकिस्तानच्या संरक्षण आणि नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाची बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी खुली करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान, ही बंदी 30 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधिचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

दरम्यान, या निर्णयाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आणि वैमानिकांना सुचना देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तसेच भारतातील लोकसभा निवडणुकांनंतर ही बंदी उठवावी किंवा नाही यावर निर्णय घेतला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करता येत नसल्याने भारतीय विमान कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तसेच आपल्या मार्गात बदल करावा लागल्याने इंधनाचा वापरही वाढला आहे. त्यातच विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधानाच्या किंमतीतही वाढ झाल्याने कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्यामुळे 400 विमानांच्या उड्डाणावर त्याचा परिणाम होत आहे.

26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर भारतीय हवाई दलाने हवाई हल्ले केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती.