अफगाणिस्तानच्या सीमेलगत पाकिस्तानातील अशांत आदिवासी भागात तालिबान्यांना लक्ष्य करीत बुधवारी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी केलेल्या जोरदार बॉम्बहल्ल्यात ६० च्या आसपास दहशतवादी मारले गेल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमध्ये अल कायदाशी संबंध असलेल्या पाकिस्तानी तालिबानी या दहशतवादी गटाचा मोठा वचक आहे. या भागात मोठय़ा प्रमाणात दहशतवादी हजर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यानुसार पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला केल्याची माहिती पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
या हल्ल्यात ६० दहशतवादी ठार झाले, तर ३० जण जखमी झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या कमांडरांचाही समावेश होता. या हल्ल्यात मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा उद्ध्वस्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पेशावर तसेच इतर भागांत नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे पक्के पुरावे सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आक्रमक भूमिका
दरम्यान, राहील शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तालिबान्यांविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. याचाच एक भाग म्हणून पाकिस्तान सैन्याकडून तालिबान्यांच्या अड्डय़ांवर हवाई हल्ले करण्याचे धोरण अवलंबिले आहे.