पाकिस्तान ब्लॉगर आणि मुक्त पत्रकार मोहम्मद बिलाल खान (२२) यांची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोहम्मद बिलाल खान सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध असून त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर विभाग आयएसआयवर वारंवार टीका केल्यामुळे ते चांगलेच प्रसिद्ध होते.

रविवारी रात्री २२ वर्षीय मोहम्मद बिलाल खान आपल्या मित्रासोबत बाहेर होते. यावेळी त्यांना एक फोन आला होता. त्या व्यक्तीने मोहम्मद बिलाल खान यांना जवळच्या जंगलात नेलं आणि हत्या केली अशी माहिती डॉन वृत्तपत्राने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे.

पोलीस अधिक्षक सद्दार मलिक नईम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येसाठी खंजीराचा वापर करण्यात आल्याची शक्यता आहे. पण काही लोकांनी गोळीबार होतानाचा आवाज ऐकल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी मोहम्मद बिलाल खान यांच्यासोबत असणाऱा त्यांचा मित्रही गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मोहम्मद बिलाल खान यांच्या वडिलांनी मुलाच्या शरिरावर धारदार शस्त्राने वार झाल्याच्या जखमा असल्याचं सांगितलं आहे. ‘माझा मुलगा ईश्वराबद्दल बोलत होता एवढीच काय ती चूक होती’, असं त्यांनी म्हटलं आहे. या घटनेमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असल्याचं ते बोलले आहेत.

घटनेनंतर सोशल मीडियावर #Justice4MuhammadBilalKhan ट्रेंड होण्यास सुरुवात झाली होती. अनेक ट्विटर युजर्सनी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयवर टीका केल्यानेच हत्या झाली असल्याचा आरोप केला आहे.