भारताने सिंधू नदीच्या खोऱ्यात हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानच्या सिंधू नदी आयोगाच्या शिष्टमंडळाने नुकताच तीन दिवसीय काश्मीर दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वुलर बंधारा, वादग्रस्त असा ३३० मेगाव्ॉटच्या किशनगंगा विद्युत प्रकल्प आदी प्रकल्पांना भेट दिली. पाकिस्तानच्या सिंधू नदी आयोगाचे अध्यक्ष आसिफ बैग यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
सिंधू नदी खोऱ्याबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी हेग येथील आंतरराष्ट्रीय लवादाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचा अंतरिम निकाल भारताच्या बाजूने लागला असला तरीही अंतिम निकाल मात्र चालू वर्षांअखेर हाती लागेल.
या पाश्र्वभूमीवर, भारतात आलेल्या पाकिस्तानी शिष्टमंडळाने झेल नदीच्या विद्यमान जलपातळीचीही पाहणी केली. यावेळी या शिष्टमंडळासह भारताचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
पाकिस्तानमधील सिंधू नदीच्या खोऱ्याची पाहणी करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ येत्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.१९६० साली जागतिक बँकेच्या पुढाकाराने झालेल्या सिंधू नदी पाणीवाटप करारातील तरतुदींनुसार दरवर्षी उभय देशांतर्फे अशी पाहणी करण्यात येते.