भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त केलं असतानाच आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचं एक ड्रोन नष्ट केल्याची माहिती आहे.

कच्छच्या सीमेवर आज (दि.26) सकाळी साडेसहाच्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालत असताना दिसलं, त्यानंतर त्याला तातडीने नष्ट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ‘इंडियाटुडे’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइक कारवाईचाच हा देखील एक भाग होता किंवा अन्य काही, याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

भारताच्या विमानांचा बॉम्बवर्षाव –
पाकिस्तानी हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत.

प्रत्युत्तरानंतर भारतीय विमानं पळाली –
भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बॉम्बहल्ला केल्याच्या वृत्ताला पाकिस्तानकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बॉम्बहल्ला केल्याचं म्हटलं आहे, पण आमच्या विमानांनी भारतीय विमानांना तातडीने प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे घाईघाईत भारतीय विमानांनी निर्जन ठिकाणी बॉम्ब टाकले आणि परत फिरले असा दावा गफूर यांनी केला आहे.

काय म्हणाले गफूर –
भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आणि बॉम्बहल्ला केला असं गफूर यांनी म्हटलं. पण भारताने टाकलेले बॉम्ब खुल्या जागी पडले, ते निर्जनस्थळी पडले. त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही, किंवा इतर कोणतंही नुकसान झालं नाही. पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताला तातडीने जोरदार प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे निर्जन ठिकाणी बॉम्ब टाकून भारताची विमानं पळाली असा दावा गफूर यांनी केला आहे. तसंच भारताने टाकलेले बॉम्ब बालाकोटजवळ पडल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.