मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण होऊन महिनाही उलटत नाही, तोवर नववर्षांच्या पूर्वसंध्येला गुजरातच्या किनाऱ्याजवळ पाकिस्तानमधून आलेल्या एका नौकेला स्फोटानंतर जलसमाधी मिळाल्याची घटना उजेडात आली आहे.
संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार ३१ डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानच्या कराची बंदरापासून जवळ असलेल्या केती बंदर येथून एक मासेमारी नौका काही संभाव्य घातपाती कृत्य करण्यास निघाल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर तटरक्षक दलाच्या नौका आणि डॉर्नियर या टेहळणी विमानांनी त्या नौकेचा शोध घेऊन पाठलाग केला. भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ आणि गुजरातमधील पोरबंदरपासून समुद्रात ३६५ किलोमीटर आत या नौकेला गाठून थांबण्याचा इशारा देण्यात आला. मात्र त्यावरील चार खलाशांनी इशारा न जुमानता नौकेचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तटरक्षक दलाने एक तास पाठलाग करून त्यांना पुन्हा अडवले. मात्र खलाशांनी स्वत:ला नौकेत बंद करून स्फोटकांनी उडवून दिले. नौकेने पेट घेऊन ती तेथेच बुडाली. खराब हवामान आणि अंधारामुळे मृतदेह हाती लागू शकले नाहीत. नववर्षांच्या पहिल्या दिवसाच्या पहाटेच हे नाटय़ घडल्याने सागरी सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.