पाकिस्तानची एक मच्छीमारी बोट सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाने जप्त केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर कच्छच्या किनाऱ्यावर कोटेश्वर खाडीनजीक सुरक्षा जवान दिसल्यानंतर पाकिस्तानी मच्छीमार पळाले. पाकिस्तानची ही मच्छीमारी करणारी बोट काल पकडण्यात आली आहे, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बोटीत आक्षेपार्ह काही सापडलेले नाही. गेल्या पाच महिन्यांत पाकिस्तानी बोट सीमा सुरक्षा दलाने जप्त करण्याची ही पाचवी वेळ आहे. गेल्या महिन्यातही त्यांनी कोटेश्वर भागातून एक बोट जप्त केली होती. जानेवारीत एक बोट सर क्रीक खाडीत पकडण्यात आली होती.