पाकिस्तान लष्कर आणि ‘आयएसआय’ची बदनामी केल्याबद्दल माध्यम नियामक प्राधिकरणाने पाकिस्तानातील अग्रगण्य दूरचित्रवाणी वाहिनी असलेल्या ‘जिओ’चा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला असून, या वाहिनीला १० दशलक्ष रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक माध्यम नियामक प्राधिकरणाचे प्रमुख परवेझ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. हा निर्णय घेण्यापूर्वी प्राधिकरणाने व्यापक चर्चा केली, तेव्हा जिओने कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्यावर वरील कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. दंडाची रक्कम परवाना निलंबनाची मुदत संपण्यापूर्वी भरावयाची आहे.
दंडाची रक्कम न भरल्यास परवान्याचे निलंबन कायम राहणार आहे. सदर परवानाधारकाने यापुढेही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांचा परवाना कायमचा रद्द करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे. प्राधिकरणाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाचे त्वरित तंतोतंत पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पत्रकार हमीद मीर यांच्यावर एप्रिल महिन्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी ‘जिओ’ने ‘आयएसआय’ आणि त्याचे प्रमुख लेफ्ट. जन. झहिरुल इस्लाम यांचे नाव घेतल्याने संरक्षण मंत्रालयाने त्याविरुद्ध तक्रार केली होती. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मीर यांच्यावर कराचीत करण्यात आलेल्या हल्ल्यात ‘आयएसआय’चा हात असल्याचे वृत्त जिओने दिले होते. त्यानंतर या वाहिनीचा परवाना निलंबित करण्याची मागणी संरक्षण मंत्रालयाने केली होती.