पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या अधिकाऱ्यांना ‘शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला होऊ शकतो’, असा सावधतेचा इशारा ऑगस्ट महिन्यातच देण्यात आला होता. १६ डिसेंबर रोजी पेशावर येथील लष्कराच्या शाळेत तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात १३३ विद्यार्थ्यांसह १४८ जण ठार झाले होते. मात्र जर त्यावेळी हा इशारा गांभीर्याने घेतला असता, तर कदाचित वेगळेच चित्र समोर आले असते, असे पुढे आले आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या अखत्यारीतील शैक्षणिक संस्थांवर तालिबानी अतिरेक्यांकडून हल्ला केला जाऊ शकतो आणि या हल्ल्यामागे सूड उगविणे हा उद्देश असेल, अशा स्पष्ट लेखी सूचना २८ ऑगस्ट रोजी देण्यात आल्या होत्या. लष्करी अधिकाऱ्यांच्या जेवढय़ा मुलांना ठार मारता येईल तेवढय़ांना टिपायचे, असे अतिरेक्यांचे स्पष्ट उद्दिष्ट आहे, असेही या इशाऱ्यात नमूद करण्यात आले होते.
ओराकझई येथील तालिबानी कमांडर खाकसर बिलाल व ओबैदुल्ला या अतिरेक्यांसह शैक्षणिक संस्थांवर हल्ल्याचा कट आखत असल्याचे ८०२ क्रमांकाच्या इशाऱ्यात स्पष्ट करण्यात आले होते, अशी माहिती जिओ न्यूज या वृत्तसंस्थेने दिली आहे. शाळांवर हल्ला झाल्यास संभाव्य हानी टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी या इशाऱ्याची प्रत खैबर पख्तुनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना, गृह मंत्रालयाला आणि अन्य संबंधितांनाही पाठविण्यात आली होती, असा दावाही करण्यात आला आहे.