श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक पाकिस्तानी कमांडर व त्याचे दोन साथीदार ठार झाले.

पुलवामा शहरात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्री त्या भागाला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येऊन दहशतवाद्यांचा नेमका ठावठिकाणा शोधण्यात आला आणि त्यांना शरण येण्याची संधी देण्यात आली. मात्र त्यांनी शोधपथकावर अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलांनी याला प्रत्युत्तर दिल्यानंतर चकमक झडली, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. पहाटेदेखील दहशतवाद्यांना शरण येण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले, मात्र त्यांनी पुन्हा शोधपथकावर गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आल्यामुळे ३ दहशतवादी मारले गेले. चकमक स्थळावरून त्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत, असे हा प्रवक्ता म्हणाला.

ठार झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्यापैकी एकजण लष्कर-ए-तैयबाचा कमांडर एजाझ ऊर्फ अबू हुरैरा असून, तो पाकिस्तानी रहिवासी होता. दुसरा जावीद अहमद राठेर हा तहाब, पुलवामा येथील, तर शाहनवाझ नझीर गनी हा सांबूरा, अवंतीपुरा येथील राहणारा असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.  पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, ठार झालेले तिघे निरनिराळ्या दहशतवादी गुन्ह्य़ांमध्ये सहभागी असलेल्या एका गटाचा भाग होते व त्यांच्यावर गुन्हेही दाखल होते.